मालवण: विविधतेतून एकतेचं दर्शन घडविणाऱ्या भारतीय संस्कृतीत खाद्यसंस्कृतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. जगभरात भारतीय खाद्यसंस्कृती प्रसिद्ध आहे, कारण येथे नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनविलेल्या चवीष्ट आणि खमंग पदार्थांचा आस्वाद घेता येतो. या संकल्पनेवर आधारित कुकिंग वर्कशॉप २०२४ चे आयोजन जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स (हॉटेल मॅनेजमेंट), साळगाव आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४.०६.२०२४ रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या कै. दादा शिखरे सभागृहात करण्यात आले होते. या वर्कशॉपमध्ये ३५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या वर्कशॉपमध्ये बटर चिकन, पालक पनीर, विविध प्रकारचे कबाब, पंजाबी डिशेस, विविध प्रकारच्या ग्रेव्ही, सणासुदीला बनवले जाणारे गोड पदार्थ तसेच विविध प्रकारचे मॉक्टेल्स यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. उपस्थित मुलांकडून प्रत्यक्ष पदार्थ तयार करून घेण्यात आले.
“कौशल्यपूर्ण शिक्षणातून हॉटेल व्यवसायाला युवा पिढी सोन्याचे दिवस आणू शकतात, त्यासाठी लागणारे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण योग्य प्रकारे घेणे आवश्यक आहे. पर्यटनवाढ ही दुधारी तलवार आहे, योग्य रित्या हाताळता नाही आली तर युवा पिढीचे नुकसान होऊ शकते, असे लोकमान्य शिक्षण विभागाचे वरिष्ठ एक्झिक्यूटिव्ह श्री. प्रवीण प्रभूकेळूसकर यांनी व्यक्त केले. अशा प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण एकत्रित राबवू, असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. श्री. देवदत्त परुळेकर यांनी केले.
या कार्यक्रमाला बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे कार्यवाहक श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, जयहिंद कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य श्री. अमेय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित खवय्यांना प्राचार्य श्री. अमेय महाजन आणि शेफ श्री. टेरी देसा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्याचा अनुभव मिळाल्याने उपस्थित खवय्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.