साळगाव, 21 जून 2024 भारताच्या प्राचीन परंपरेची अमूल्य देणगी असलेल्या योगाच्या महत्त्वाची ओळख करून देत जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स, साळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. सौ. मनाली सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिकांनी झाली. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विविध योगासने सादर केली. मनाली सावंत यांनी योग शास्त्राची माहिती विद्यार्थ्यांसमोर सादर करताना योगाचा मेंदू आणि शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट केला. यावेळी उपस्थितांना योगाच्या नियमित साधनेचे महत्त्व पटवून दिले. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागील वैज्ञानिक कारणांची माहिती देताना, 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असल्याचे आणि या दिवशी सूर्य उत्तरायण संपवून दक्षिणायन सुरू करतो याचे महत्त्व समजावण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी “स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” ह्या थीम आधारे योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जयहिंद कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य मान. अमेय महाजन, प्राध्या. टॅरी डिसा, प्राध्या. हृषिकेश सूर्याजी, प्राध्या. हर्षद धुरी आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्या. ऐश्वर्या करंदीकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपाला प्राचार्य अमेय महाजन यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले आणि योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. या योग दिनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग साधनेविषयी जागरूकता वाढली असून, ते आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.